हाच आमचा स्वर्ग
बेगमांच्या महालावर पहारा देणाऱ्या खोजांवर बादशहा एकदा फारच संतापला व त्यांना आपल्या राज्या बाहेर निघून जाण्यास फर्मावले. त्यामुळे हवालदील झालेले ते सर्व खोजे बिरबलाकडे आले. आणि काहीतरी उपाय करून खाविंदांना हुकूम मागे घेण्यास लावा, अशी विनंती त्याला करू लागले.
बिरबलाने त्यांना काय करायचे ते हळूच सांगितले. ते ऐकून व त्याप्रमाणे वागण्याचे आश्वासन बिरबलाला देऊन ते सर्व खोजे तेथून निघून गेले.
दुसरे दिवशी सकाळी बादशहा फिरायला जाण्यासाठी बाहेर पडला तर, एका मोठ्या वृक्षाच्या शेंड्यावर बसून ते पंधरा वीस खोजे ‘हे अल्ला आम्हाला स्वर्गात ने’, अशी परमेश्वराची प्रार्थना करीत असलेले त्याला दिसून आले. बादशहा त्यांच्याकडे गेला आणि विचारले, ‘काय हो, माझ्या राज्यातून निघून जायला मी कालच तुम्हाला सांगितले होते.
अस असता तुम्ही माझ्या राज्यातल्याच एका झाडावर बसून आपल्याला स्वर्गात घेऊन जाण्याची प्रार्थना अल्लाला का बरे करीत आहात?’
बादशहाचा प्रश्न ऐकून खोजांचा प्रमुख झाडाच्या शेंड्यावरूनच म्हणाला – ‘खाविंद, आपले राज्य हाच आमचा स्वर्ग आणि तुम्ही आमचे सर्वश्रेष्ठ देव, म्हणून अशा स्वर्गतुल्य राज्यात आम्ही इतकी वर्षे राहिलो असता, नरका समान वाटणाऱ्या दुसऱ्या राज्यात आमचे मन कसे बरे रमेल ?
पण आता आपण आम्हाला राज्यातून निघून जाण्याचा हुकूम काढल्याने आम्ही आता अल्लाला स्वर्गात नेण्यासाठी प्रार्थना करीत आहोत. आणि अल्लाने आमचे म्हणणे ऐकले नाही, तर झाडावरून खाली उड्या मारून त्या वरच्या स्वर्गात जाण्याचा बेत आम्ही केला आहे.’
– त्या सर्व खोजांच आपल्या राज्यावर व आपल्यावर असलेले प्रेम पाहून बादशहाने आपला हुकूम मागे घेऊन त्या खोजांना राजवाड्यावर येण्याचा हुकूम सोडला.
Recent Comments