यमुना नदीचा विवाह
एकदा काही तरी कारणाने बिरबल व बादशहा यांच्यात भांडण झाल्याने बिरबल रागाने कुठेतरी गायब झाला. खूप शोधूनही जेव्हा बिरबल सापडेना तेव्हा बादशहाने त्याला शोधण्यासाठी एक युक्ती योजली.
बादशहाने सर्व राजेरजवाड्यांना पत्रे पाठविली – ‘आमच्या राज्यातील यमुनानदीचे लग्न सागराशी करण्याचे ठरविले आहे, तेव्हा अमक्या दिवशी आपल्या राज्यातील सर्व नद्या या लग्न समारंभाला पाठवून तुम्ही या मंगल सोहळ्याची शोभा वाढवावी.’ अशी पत्रे सर्वत्र रवाना केली.
लग्नाच्या निमंत्रणपत्रिका मिळताच सर्व राजे विचार करू लागले. ‘यमुनेच्या विवाहाला आपल्या राज्यातल्या नद्यांना कसे काय पाठवून द्यायचे? बरं, सम्राटाचे निमंत्रणाला नकारही देता येत नाही.’ अशा प्रकारे सर्व राजे गहन विचारात पडले असता राजस्थान मधील एका स्वतंत्र्य राजाने मात्र सम्राट अकबराला पत्र लिहून कळविले की – ‘चि. सौ.कां. यमुना हिच्या विवाहाचे आमंत्रण आल्यापासून आमच्या येथील सर्व नद्या लग्न समारंभाला येण्यासाठी फारच उत्सुक झाल्या असून, त्यांची फक्त एक अट आहे की लग्नाच्या आदल्या दिवशी सम्राटाच्या राज्यातील सर्व तळ्यांनी – विहिरींनी आमच्या राज्यातील नद्यांचे स्वागत करण्यासाठी राज्याच्या सिमेवर हजर राहिले पाहिजे.
अशी व्यवस्था झाल्याचे कळताच आम्ही आमच्या येथील सर्व नद्यांना दिल्लीला रवाना करीत आहोत.’
राजस्थानाच्या राजाचे हे पत्र वाचताच बादशहाने ओळखले की – ‘येथे बिरबलानेच डोके चालवले आहे.’ मग बादशहाने आपल्या काही मंत्र्यांना त्या राजाकडे रवाना करून बिरबलाची समजूत काढली व त्याला अत्यंत सन्मानाने दिल्लीला बोलावले.
Recent Comments