बिरबलची खिचडी
थंडीचे दिवस होते. सम्राट अकबरने एके दिवशी एक घोषणा केली की त्याच्या राजवाडयासमोरच्या जलकुंडात जो कोणी रात्रभर उभा राहिल, त्याला शंभर सुवर्ण मुद्रा देण्यात येतील. हि दवंडी राज्यभर पिटवली गेली. ती दवंडी ऐकून एक गरीब माणूस ते साहस करायला तयार होता.
तो माणूस त्या थंडीत रात्रभर जलकुंडात कुडकुडत उभा राहतो. हया थंडीने तो माणूस मरून जाईल असे सेवकाने बिरबलला सांगितले. बिरबल बोलला ‘तो डोक्याने मजबूत आहे व यश मिळविण्यासाठी तो तयार आहे.’
दुसऱ्या दिवशी सकाळी अकबर येतो तेव्हा तो माणूस आपल्या जागेवर आनंदात उभा असतो. तो माणूस त्या थंड पाण्याच्या जलकुंडातून बाहेर येतो व आपण यशस्वी झालो असे त्याला वाटते.
‘तू ही अशक्य गोष्ट कसे काय करू शकला?’ राजाने विचारले. ‘हे अतिशय अवघड काम होते व ते तू अगदी सहजगत्या शक्य करून दाखविले. माझा यावर विश्वासच बसत नाही.’ यामागचे गुपित काय?’
‘महाराज हया मागे गुपित असे काहीही नाही. मी फक्त विजयी होण्याचा निर्धार केला होता.’ तो गरीब माणूस बोलला.
अकबरने विचारले ‘तू तुझी पूर्ण रात्र या गार पाण्यात कशी घालवली?’
‘मी राजवाडयातील दिव्याकडे बघत होतो.’
‘आता लक्षात आले!’ अकबर बोलला. ‘तर तू तुला लागणारी ऊब माझ्या राजवाडयात रात्रभर चालू असणाऱ्या दिव्यापासून मिळविली त्यामुळे तुला थंड पाण्यात थंडी वाजलीच नाही व तुझी पूर्ण रात्र आरामात गेली. तर याबाबतीत मी तुला काहीही बक्षिस देणार नाही. तू तुझ्या घरी जाऊ शकतोस.’
तो गरीब माणूस दुःखी होतो. त्याला वाटते की आता बिरबलच आपल्याला न्याय देईल. तो बिरबलकडे जाऊन संपूर्ण घटना त्याला सांगतो. बिरबल त्याला म्हणतो ‘तू घरी जा, मी बघतो काय करायचे ते.’
दुसऱ्या दिवशी बिरबल अकबरकडे येतो व म्हणतो की ‘मी आता खिचडी तयार करायला शिकत आहे , तरी उदया सकाळी तुम्ही माझ्या घरी खिचडीची चव बघायला या.’
बिरबलने जेवणाचे आंमत्रण दिल्यामुळे अकबर खुश झाला. दुसऱ्या दिवशी अकबर बिरबलच्या घरी पोचला. बिरबलने त्याचे स्वागत केले व त्यांना बसविले.
बराच काळ गेल्यानंतरही बिरबलच्या घरातून कोणीही राजाला साधे पाणीही दिले नाही. अकबरला खूप भूक व तहान लागली होती.
‘बिरबल कूठे आहे?’ राजाने विचारले.
‘घराच्या बाहेर बागेत.’ सेवकाने उत्तर दिले.
‘मी तासाभरापूर्वीही हाच प्रश्न विचारला होता , तेव्हाही तू हेच उत्तर दिले होते.’ अकबरने विचारले ‘तो बागेत काय करत आहे?’
सेवक म्हणाला. ‘माफी असावी महाराज, तो खिचडी बनवण्यात व्यस्त आहे.’
अकबर खूप चिडला व उठून उभा राहिला आणि सेवकावर ओरडला.
सेवक म्हणाला , ‘जे सत्य आहे मी तेच सांगत आहे.’
अकबर दरबाऱ्यांबरोबर बिरबलच्या बागेत गेला. बिरबलने एक छोटीशी चूल पेटवून बऱ्याच उंचावर एका मडक्यात खिचडी शिजवायला ठेवली होती.
‘कुठे आहे तुझी खिचडी?’ अकबरने विचारले.
बिरबलने उंचावर टांगलेल्या मडक्याकडे बोट दाखविले. अकबर व सर्व दरबाऱ्यांनी आपल्या माना त्या मडक्याकडे वळविल्या.
‘हे काय आहे बिरबल?’ तू एवढा हुशार आणि चतुर मग तुला एवढे समजत नाही की खिचडी आणि विस्तवात एवढे अंतर असेल तर मडक्यापर्यंत उष्णता पोहचणार नाही व खिचडी कशी शिजेल?’
तेव्हा बिरबल म्हणाला ‘क्षमा असावी महाराज दूरच्या दिव्याची ऊब घेऊन एखादा माणूस रात्रभर कडाक्याच्या थंडीत उभा राहू शकतो तर मग याच न्यायाने इतक्या अंतरावरून विस्तवाच्या ऊबेने खिचडी शिजायला काय हरकत आहे?’
अकबर बोलला, ‘मला आता समजले की तुला काय म्हणायचे आहे. मी त्या गरीब माणसाबरोबर दृष्टपणा केला आहे व मला माझी चूक लक्षात आली आहे. मी तुला वचन देतो की मी त्याला दोनशे सुवर्णमुद्रा देईन.’
त्या गरीब माणसाला दुपटीने सुवर्णमुद्रा मिळणार आहे म्हणून बिरबल आनंदी झाला. ‘कृपया आपण माझ्या घरात चलावे तेथे मी आपल्या जेवणाची व्यवस्था केली आहे. बऱ्याच प्रकारचे खादय पदार्थ व खिचडी यांची मेजवानी ठेवली आहे.’
सर्वांनी आनंदाने व हसत खेळत जेवण केले.
Recent Comments