तुमच्यापेक्षा दगड चांगला..!
शत्रूशी झालेल्या एका लढाईत अकबराचा एक सरदार मारला गेला. त्यामुळे त्या सरदाराच्या बायको-मुलांवर उपासमारीची वेळ आली. म्हणून एके दिवशी त्या सरदाराची बायको बिरबलाकडे आली व त्याला आपली कर्म कहाणी सांगून आपल्याला पोटापुरती मदत बादशहा कडून मिळवून द्यावी, अशी विनंती केली. मदत करण्याचे आश्वासन देऊन बिरबलाने दुसऱ्या दिवशी दरबारात कसे यायचे, आणि कसे वागायचे, बोलायचे ह्याची माहिती तिला दिली.
_ दुसऱ्या दिवशी ती महिला दरबारात आली. बादशहाला नमस्कार करून त्याच्या हातात एक तलवार देत म्हणाली ‘खाविंद, माझे धनी विजयसिंह यांनी शत्रूशी झालेल्या अनेक लढायात महान पराक्रम गाजवून आपल्याला विजय मिळवून देण्यास मोठी मदत केली. परन्तु गेल्या वर्षी झालेल्या एका युद्धात पाठीमागून शत्रूने केलेल्या हल्ल्यात तलवारीच्या जबरदस्त घावाने त्यांना वीरगती प्राप्त झाली. त्यांच्यानंतर घरात कोणीही कमावते नाही. माझ्यावर व माझ्या लेकराबाळांवर उपासमारीची वेळ आली, म्हणून माझ्या वीर, पराक्रमी पतीची तलवार तुम्ही घ्यावी आणि तिची वाजवी किंमत मला द्यावी ही विनंती.’
बादशहाने ती तलवार तिला परत केली. वर शंभर सुवर्णमोहरा दिल्या. हे सर्व पाहून बिरबल बादशहाला म्हणाला ‘खाविंद, खरे तर परीस हा एक प्रकारचा दगडच आहे. पण त्याचा स्पर्श जरी या तलवारीला झाला असता तरी ती तलवार संपूर्णपणे सुवर्णाची झाली असती. आणि त्यातील थोडे-थोडे सोने विकून त्याच्यावर त्या वीर पत्नीला व तिच्या मुलांना आपला उदरनिर्वाह करता आला असता. पण सम्राटाचा हस्तस्पर्श होऊन सुद्धा ती तलवार आहे तशीच राहिली व त्या बाईला मामुली शंभर सुवर्णमोहरांचीच प्राप्ती झाली हे एक नवलच नाही का?
म्हणजे एका अर्थाने तुमच्या पेक्षा तो दगड असलेला परीसच अधिक चांगला नाही का? ज्या वीराने खाविंदाच्या राज्याच्या रक्षणासाठी शत्रशी झालेल्या लढाईत आपल्या प्राणाची आहुति दिली, त्याची मुलं कमावती होईपर्यंत निदान त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची काळजी घेणे हे बादशहाचे कर्तव्य नाही का?’
बिरबलाने केलेल्या कान उघाडणीने बादशहाला आपली चूक समजली व त्याने काही सुपीक जमीन-जुमला त्या वीरपत्नीला आणि तिच्या मुलाबाळांना चरितार्थासाठी इनाम म्हणून दिला.
Recent Comments